From Manoj kolhatkar who plays krutika's dad in STAK :
#स्थळ : खानवेल रिसॉर्ट, सिल्वासा
#वेळ : सकाळी ८ ची
नाश्त्याच्या बुफे टेबलवर माझ्या प्लेटमधे दोन टोस्ट, चहाचा मग आणि बाऊलमधे घट्ट दही घेत मी पुढे सरकतो आणि गरमागरम पराठा घेण्यासाठी रांगेत वाट पाहात उभा राहातो. त्या दिवशी दोन ऐवजी एकच शेफ कामावर आलेला दिसतो. तो पराक्रमाची शर्थ करत असतो पण समोर लांबत चाललेली रांग आणि त्याची कार्यक्षमता यांचं गणित काही जुळत नसतं. मी शुटिंगचा कॉल टाईम, घड्याळ दाखवत असलेली वेळ यांचा मेळ घालत, वैतागून रांग सोडतो आणि माझं कोपऱ्यातलं आवडतं टेबल पकडतो ! (एखाद्या परक्या ठिकाणीही पहिल्या दिवशी मी जी जागा पकडतो तीच मला मुक्कामाच्या शेवटच्या दिवसापर्यंत हवी असते .. अटॅचमेन्ट .. दुसरं काय ! नटाला अटॅचमेन्ट हवीच !) नाश्ता बोंबलला या विचारात, भुकेल्या पोटी जरा चिडचिडतच मी टोस्ट आणि चहा ढोसू लागतो. माझं चहापान संपेस्तोवर माझ्यासमोर एक डिश येते आणि एक उंच, हसतमुख व्यक्ती त्यातून दोन गरमागरम पराठे उचलत माझ्या डिशमधे वाढते. मी मान उचलून वर पाहातो आणि अवाकच होतो. तुम्ही कशाला .. असं काहीतरी मी पुटपुटतोय तोवर ती व्यक्ती गोड हसत म्हणते, मी पाहिलं होतं, तुम्ही रांगेत थांबला होतात, म्हणून आणले, गरमागरम आहेत, घ्या ! एवढ्यात टेबलावरचा माझा फोन वाजतो, प्रॉडक्शन मॅनेजरचा कॉल असतो, सर, गाडी रेडी आहे (शूटिंग लोकेशनवर जाण्यासाठी !). परत समोरची उंच व्यक्ती हसत मला दटावते, थांबेल तो .. नाश्ता संपवल्याशिवाय जायचं नाही ! मला एकदम बापाचीच आठवण येते आणि घट्ट-गोड दह्यातला पराठयाचा घास माझ्या घशातच अडकतो !
हे आभार प्रदर्शनाचं भाषण नाहीये, पण स्टार प्रवाह वाहिनीवरील "सांग तू आहेस का" ही आमची मालिका आता लवकरच रसिक प्रेक्षकांचा निरोप घेणार असताना एक छोटासा प्रसंग तुम्हाला दाखवावा (कारण तुम्ही तो मालिकेत पाहिलेला नाही !), म्हणून केलेला हा लेखन प्रपंच आहे ! आमच्या इंडस्ट्रीतल्या वाईटाबद्दल नेहमीच चव्हाट्यावर चर्चा होते, अगदी चघळून चघळून होते, पण कुठे काही चांगलं घडत असेल, तर त्याची मात्र दखलही घेतली जात नाही, ती घेण्याचा हा प्रयत्न, नव्हे ते माझं कर्तव्यच !
यंदाच्या लॉकडाऊनमधे आमची अक्खी इंडस्ट्री मुंबईतून विस्थापित झाली होती. गोवा, हैद्राबाद, दमण, सिल्वासा अशी कुठेकुठे गेली होती माणसं पोटामागे .. एका वेगळ्याच ताणात काम करत होते सगळे ! वारंवार कराव्या लागणाऱ्या कोविड टेस्ट, सेटवर एंट्री करताना चेकअप, बायोबबलचा प्रोटोकॉल सांभाळायची तारांबळ, कितीही डिस्टन्स ठेवायचं म्हटलं तरी अपरिहार्यपणे ५०-६० लोकांशी येणारा रोजचा संबंध. सगळ्यात जास्त vulnerable प्राणी म्हणजे नट .. मेकपमनपासून ते ओएस शॉटला उभं राहिल्यावर थेट तोंडावर येणारा दुसरा नट .. इतकं निकटचं सान्निध्य ! दीर्घ काळ मागे सोडून आलेले कुटुंबीय, त्यांच्या आरोग्याची काळजी, अशी सगळी ओझी वागवत काम सुरू होतं ! अशात, 'कामाचं' म्हणून आपलं असं एक नेहमीचं टेन्शन असतंच. आणि काळ-काम-वेगाच्या गणितात जिथे शूट केलेली मिनिटं .. 'फूटेज' हेच कार्यक्षमतेपासून दर्जापर्यंत सगळ्याचं मोजमाप करण्याचं एकमेव परिमाण होऊन बसलंय, तिथे एक 'निर्माता' माणूस या सगळ्याची पर्वा न करता, स्वतः आपल्या नटाला सर्व्ह करतो आणि सांगतो, की नाश्ता संपवूनच कामाला लागायचं हं, तेव्हा घास अडकतोच की हो राव घशात !
होय, ज्या उंच, हसतमुख व्यक्तीबद्दल मी वर लिहिलंय ती म्हणजे 'आयरिस प्रॉडक्शन्स' चे सर्वेसर्वा-निर्माते, विद्याजी .. श्री. विद्याधर पाठारे ! तीस-पस्तीस वर्षांपेक्षा जास्त काळ कार्यरत असलेले इंडस्ट्रीतले सुरुवातीचे नामवंत एडिटर आणि नंतर निर्माते. आपल्या कास्ट आणि क्रू ची काळजी घेणं असो, त्यांच्यासाठी वॅक्सिनेशन कॅम्प अरेंज करणं असो, आर्थिक व्यवहारातली शिस्त पाळणं असो, कुणाची काही अडचण सोडवणं असो, तारखा ऍडजेस्ट करणं असो .. प्रत्येक बाबतीतच अतिशय सहृदयतेने विचार करणारा हा मोठा माणूस ! सिल्वासामधल्या दोन महिन्यांच्या वास्तव्यात कितीदातरी याची प्रचिती आली. वरचा प्रसंग असो किंवा कधी गाड्यांचं शॉर्टेज असताना, अगदी सहजगत्या आपल्या आलिशान गाडीतून क्रू मेंबरना स्वतः ड्राईव्ह करत लिफ्ट देणं असो .. कुठेच हा माणूस मागे नाही आणि महत्वाचं म्हणजे, समोरच्या माणसासाठी आपण काहीतरी विशेष करतोय असा आविर्भाव तर बिलकूलच नाही ! तीन दशकांहून अधिक काळ एक प्रॉडक्शन हाऊस अत्यंत यशस्वीपणे चालवलेला कुठला निर्माता करतो हो आज एवढं सगळं आपल्या सोबतच्या माणसांसाठी ? जसा कुटुंबप्रमुख असतो तसंच कल्चर मग कुटुंबात रुजतं, त्यामुळे आयरिसच्या एकूणच परिवारात ती एक आदब जाणवते. विद्याजी, खूप काही शिकलो त्या दोन महिन्यांत तुमच्याकडून .. रियली हॅट्स ऑफ टू यू ! महत्वाची गोष्ट शिकलो ती ही, की माणसं उगाच नाही मोठी होत .. त्यामागे काही फिलॉसॉफी असते, प्रामाणिक प्रयत्न असतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे चांगल्या कर्मांतून कमावलेले दुवा असतात !
विद्याजींसारखी चार नावं या इंडस्ट्रीत आहेत, म्हणून इथे काम करण्यात मझा आहे !
विद्याजी, तुम्हाला आणि आयरिसला मनःपूर्वक धन्यवाद आणि उदंड शुभेच्छा !! 💐🙏🏻
आयरिस परिवारातील अलंकार पाठारे, प्रॉडक्शन टीम, लेखक टीम, डिरेक्शन टीमसह सर्वच तंत्रज्ञ, स्टार प्रवाह वाहिनीची टीम आणि माझ्या सर्वच सह-कलावंतांनी गेलं वर्ष संस्मरणीय केलं त्याबद्दल त्यांना खूप खूप प्रेम आणि अंतःकरणपूर्वक शुभेच्छा ! 🤗
#स्टार_प्रवाह
#सांग_तू_आहेस_का
#आयरिस_प्रॉडक्शन्स
1.3k